Jalgaon News: स्वस्त धान्य दुकानात प्लॅस्टिकचा तांदूळ ही अफवाच !

जळगाव : केंद्र तसेच राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारका ना गहू तांदूळ आदी वस्तूंचा मोफत लाभ दिला जात आहे. यात स्वस्त धान्यात तांदुळात प्लॅस्टिक भेसळयुक्त तांदळाचा पुरवठा केला जात असल्याचा अपप्रचार केला जात आहे. प्लॅस्टीक भेसळयुक्त तांदूळ ही अफवाच असून प्रत्यक्षात विविध पोषणतत्वयुक्त व मुख्यावर्धीत फोर्टिफाईड तांदूळ असल्याचे जिल्हा पुरवठा प्रशासनाने म्हटले आहे.

स्वस्त धान्य दुकानांवर अंत्योदय, बीपीएल, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना शास्त्रोक्त पद्धतीने तयार आलेला पोषणतत्वयुक्त व मुल्यावर्धीत फोर्टिफाईड तांदूळ वितरीत केला जात आहे. पोषणतत्वयुक्त व मुत्यावर्धीत फोर्टिफाईड तांदळाचे प्रयोगशाळेत प्रक्रिया व संशोधन करण्यात आले आहे. तज्ज्ञ व्यक्ती व नामांकित संस्थांकडून याला मान्यता देण्यात आल्यानंतरच राज्य शासनाच्या लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थे मार्फत पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदुळ शासन निर्देशानुसार विशिष्ट प्रमाणात समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत १७ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानातून वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

थॅलेसेमिया, सिकेल सेल व अॅनिमिया रूग्णांसाठी उपयुक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात अॅनिमिया मुक्त व आरोग्यदायी भारत अभियान राबविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने थॅलेसेमिया, सिकेल सेल व ऑनमिया या आजारांना संवेदनशील असलेल्या लोकसंख्येला फोर्टीफाईड तांदुळ वितरीत करण्यात येत असून नागरिकांनी या तांदळाचा आपल्या आहारात समावेश करावा, थैलेसेमिया, सिकेल सेल व अॅनिमिया या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सकस आहारातून शरीर सुदृढ बनविणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनस्तरावर विशेष उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांच्या दैनंदिन आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करण्यासाठी फोर्टिफाईड तांदळाची निर्मिती करण्यात आली आहे.

काही सेकंद फोर्टिफाईड राईसचे दाणे पाण्यावर तरंगतात

लोह, फॉलिक अॅसिड, विटामिन-१२ या पोषणमूल्यांनी युक्त असलेला तांदूळ म्हणजे फोर्टीफाईड राईस. मुल्यावर्धीत पोषणतत्वयुक्त फोर्टीफाईड तांदुळात १०० दाण्यांमागे १ दाणा असे प्रमाण असून एक दाण्यात अनेक पोषणम त्यांचा समावेश आहे. त्यामुळे फोर्टीफाईड तांदुळाचे दाणे हे इतर तांदूळापेक्षा वेगळे दिसतात. राज्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये आता फोर्टीफाईड राईस पुरवठा केला जात आहे. फोर्टीफाईड राईस पाण्यात टाकल्यानंतर काही सेकंद यातील फोर्टीफाईड राईसचे दाणे हे पाण्यावर तरंगतात. त्यामु‌ळे तो प्लास्टिकचा आहे असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. परंतु तो प्लास्टिकचा नसून लोह, फॉलिक अॅसिड, विटामिन-१२ या पोषणमूल्ययुक्त शास्त्रीयदृष्ट्या संशोधीत सुक्ष्म अन्नघटक असलेला तांदूळाचा पुरवठा केला जात आहे. तांदूळ प्लॅस्टिकयुक्त असत्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

-संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव