---Advertisement---

Flag Fundraiser : सैन्यदलातील शहीद वीर माता, पिता, विरपत्नी यांना भूखंड मिळवून देऊ , जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

by team
---Advertisement---

जळगाव :  जिल्ह्यात माजी सैनिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. यामध्ये 11 शहीद वीर माता, पिता आणि वीरपत्नी यांना भूखंड वाटप करण्याचा मुद्दा चर्चिला गेला. मात्र, जमिनीची उपलब्धता नसल्यामुळे हा मुद्दा प्रलंबित राहिला असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येत्या काही महिन्यात भूखंड मिळवून देण्याची ग्वाही दिली.

सैनिक कल्याण कार्यालयाच्या ध्वज निधी संकलन कार्यक्रम-2024 मध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे 2 हेक्टर भूखंड डिफेन्स कॉलनीसाठी देण्यात येईल, ज्यामुळे सुमारे 200 सैनिकांना घराची सोय होईल. यावर कार्यवाही सुरू आहे. तसेच, पाचोरा आणि भडगाव येथील सैनिकांसाठीही विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

डिफेन्स स्कूल सुरू करण्याच्या आवश्यकतेबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. माजी सैनिकांना नोकरीऐवजी भूखंडावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची संधी दिली जाईल, असेही ते म्हणाले.

ध्वज निधी संकलनाच्या बाबतीत, जिल्ह्यात दरवर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक रक्कम संकलित होते. 2023 मध्ये उद्दिष्ट 1 कोटी 18 लाख ठेवण्यात आले होते, परंतु 1 कोटी 23 लाख जमा झाले. पुढील उद्दिष्टासाठी अधिक रक्कम दिली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.  देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक जण पुढे येऊ शकतात. त्यासाठी महानगरपालिका, पालिका, सेवा केंद्र याठिकाणी ध्वज निधी संकलन कॅशलेस ठेवावे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी, सैनिकांच्या पाल्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार देण्यात आले. तसेच, सर्वाधिक निधी संकलन करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचा गौरव केला गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश पाटील यांनी केले. त्यात त्यांनी जिल्हा सौनिक कल्याण विभागामार्फत केलेल्या कामाची सविस्तर माहिती सांगितली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment