नशिराबाद पोलीस ठाण्यात पाच अधिकारी अन् 45 पोलीस; पण गाव रामभरोसे, नागरिकांकडून संताप!

---Advertisement---

 

नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद परिसरात गुन्हेगारीच्या प्रमाण वाढ होताना दिसून येत आहे. अशात नशिराबाद पोलीस ठाण्यातून एक चिंताजनक बाब समोर आली आहे. अर्थात नियुक्त असलेले पाच अधिकारी आणि 45 पोलीस कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिणामी गाव पूर्णपणे रामभरोसेच असल्याचे म्हणत, नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पोलीस ठाण्यात दिवसभर मोजकेच पोलीस हजर असतात. उर्वरित अधिकारी आणि कर्मचारी कुठे असतात, कोणत्या ड्युटीवर असतात, याबाबत स्पष्ट माहिती नाही. गावात वाढणाऱ्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी मोकाट सुटत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून होत आहे.

गत काही महिन्यांपासून नशिराबाद व परिसरात घरफोड्या, मारहाणीच्या घटना, वाहतूक नियमांचे उल्लंघन, अवैध धंदे यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून “पोलीस करतात तरी काय?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या विभागातीलच अशी बेफिकिरी उघड होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नशिराबादमध्ये गुन्हे रोखण्यासाठी आणि मुख्यालयी अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहावे, यासाठी तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये एकूण 50 पोलीस कर्मचारी कार्यरत असतानाही, रात्रीच्या वेळी स्टेशनमध्ये केवळ एक किंवा दोनच कर्मचारी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे नशिराबाद पोलीस मुख्यालय वास्तव्यास असलेल्या वसाहतीत एकही पोलीस किंवा अधिकारी राहत नसल्याचे निदर्शनास आले असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक वाढली आहे.

५०,००० पेक्षा जास्त लोकसंख्याचे गाव

नशिराबाद हे ५०,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले नगरपरिषदेचे शहर असून, या शहराला लागून नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक खेडी आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे व संवेदनशील स्वरूपाचे शहर व हद्दीत असलेले अनेक छोटे-मोठे खेडे असल्याने येथे पुरेसे पोलीस मनुष्यबळ आणि सतत उपलब्ध असलेली पोलीस उपस्थिती असणे अत्यावश्यक आहे, मात्र या ठिकाणी पोलीस मनुष्यबळ अत्यावश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे

दरम्यान, नशिराबाद हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर असल्याने वाहतुकीची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघात, वाद, तातडीच्या घटना कोणत्याही वेळी उद्भवू शकतात. पण रात्री मनुष्यबळ अत्यल्प असल्याने अशा घटनांवर प्रतिसाद देण्यास अडथळे निर्माण होतात, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. अलीकडे गावात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी मालवाहू गाडी चोरीला जाण्याचा प्रकार, तसेच गुरांची चोरी यांसारख्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री कमी गस्त असल्याचा फायदा गुन्हेगार घेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नशिराबादचा वाढता विस्तार, मोठी लोकसंख्या, राष्ट्रीय महामार्गावरील स्थिती, तसेच वाढत्या गुन्हेगारीचा विचार करता रात्रपाळीत पोलीस संख्या वाढवणे, मुख्यालयात अधिकारी व कर्मचारी वास्तव्यास ठेवणे, तसेच गस्त पद्धती अधिक मजबूत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे निदर्शनास आले आहे. नशिराबादसारख्या मोठ्या आणि संवेदनशील गावात पोलीस उपस्थिती वाढवली नाही, तर पुढील काळात गंभीर घटनांचा धोका नाकारता येत नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---