Jalgaon News : चुकीला माफी नाही ! अखेर पीएसआयसह दोन पोलीस निलंबित, पोलीस दलात खळबळ

जळगाव ।  जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडविणारी घटना उघडकीस आली आहे. एका ग्रामसेवकाची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यात एका पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, समाजातील विश्वासाचा गैरफायदा घेणाऱ्या टोळ्यांकडून असे प्रकार सातत्याने घडत आहेत. जळगावातील या प्रकरणाने पुन्हा एकदा पोलिस आणि नागरिकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवक विकास पाटील यांना पैसे तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून  त्यांची १६ लाख रुपयांत फसवणूक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, या घटनेत पोलिस कर्मचारीदेखील सामील असल्याचे उघड झाले आहे.

पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके (मुख्यालय) व पोकों दिनेश भोई (फैजपूर) या पोलिसांसह रक्कम घेऊन जाणारा नीलेश अहिरे याचे नाव निष्पन्न झाले. त्यावरून या चौघांसह सचिन धुमाळ या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले.

ग्रामसेवक विकास पाटील यांच्याशी ओळख असलेल्या सचिन धुमाळ यांनी मैत्रीचा गैरफायदा घेतला आणि त्यांना फसवले. विशेषतः क्रिकेट सामन्यांतून वाढलेली ओळख, देवदर्शनाच्या सहलीतून निर्माण झालेला विश्वास आणि तिप्पट पैसे मिळवण्याच्या प्रलोभनामुळे हे प्रकरण घडले.

या घटनेत सहभागी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.