देऊळगाव राजा: बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलिसाच्या संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. जालना पोलिस दलातील ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के यांचा मृतदेह त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये आढळून आला. ही घटना रविवार ३० मार्च रोजी देऊळगाव राजा-सिंदखेडराजा मार्गावरील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलसमोरील वनविभागाच्या जागेत उघडकीस आली.
प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, गाडी आतून बंद होती. त्यामुळे हा घातपात की आत्महत्या, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
हेही वाचा : १ एप्रिलपासून देशात लागू होणार नवे नियम, घरातील प्रत्येकाच्या खिशावर होणार परिणाम!
याच महिन्यात २३ मार्चला अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीत भागवत गिरी या पोलिसाचा खून झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एका पोलिसाचा मृतदेह आढळल्याने पोलिस प्रशासन हादरले आहे. उपविभागीय अधिकारी मनीषा कदम आणि पोलिस निरीक्षक व संतोष महल्ले यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी सहायक पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी पाहणी केली. तसेच श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.