धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाहीत, या रागातून सुनील नारायण कोळी या नराधम बापाने आपल्या पाच वर्षांच्या मुलगा कार्तिक आणि तीन वर्षांच्या मुलगी चेतना यांना तापी नदीत फेकून निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वादातून घडली भयावह घटना
थाळनेर येथील कुंभार टेक भागात सुनील नारायण कोळी हा आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने घरगुती वाद नेहमीच घडत असत. मंगळवारी (४ फेब्रुवारी) त्याने पत्नी छायाबाई कोळी यांच्याकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे सुनील कोळी संतापला. रागाच्या भरात त्याने आपल्या दोन निष्पाप मुलांना सोबत घेतले आणि गावाजवळील तापी नदीच्या पात्रात नेऊन फेकून दिले.
हेही वाचा : मुलीशी अनैतिक संबंध, घरी बोलावून बापाने विवाहित प्रियकराला संपवलं; घटनेमुळे परिसरात खळबळ
घटनास्थळी पोलीस दाखल
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ हालचाली करून दोन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र, त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शिरपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आला.
हेही वाचा : Shirish More : जीवन संपवण्यापुर्वी महाराजांनी लिहून ठेवली होती चिठ्ठी, उलगडले कारण
हत्या करून फरार, पोलिसांचा शोध सुरू
या प्रकरणी छायाबाई कोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये सुनील कोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुनील कोळी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याला पकडण्यासाठी थाळनेर पोलीस ठाण्याचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील विविध संशयित ठिकाणी त्याचा शोध सुरू आहे.
परिसरात संताप आणि हळहळ
एका मद्यपी बापाने आपल्या दोन निष्पाप लेकरांचा अमानुषपणे जीव घेतल्याने शिरपूर तालुक्यात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. समाजात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.