Amalner: अमळनेर येथील एका पुजाऱ्याचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळोद येथे नदीकाठावर बुधवारी दुपारी घडली.
अमोल श्यामकांत शुक्ल (वय ३८, रा. अमळनेर) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. जळोद येथे नदीकाठावर एका इसमाच्या उत्तरकार्याच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पूजेच्या विधीनुसार होम पेटवण्यात आला. त्यातून निर्माण झालेल्या धुरामुळे पुलाच्या वरच्या भागात असलेल्या मधमाशांच्या पोळ्यापर्यंत धूर गेला आणि मधमाशा मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून उपस्थितांवर हल्ला चढवला.
मधमाशांच्या हल्ल्यामुळे पूजेला बसलेले लोक भयभीत होऊन सैरावैरा पळू लागले. मात्र, त्याचवेळी पुजारी अमोल शुक्ल यांनी इतरांना सांगितले की, पळू नका, खाली झोपून घ्या. त्या चावणार नाहीत. आपण पळालो तर त्या आपल्याला चावतील असे म्हणत ते खाली वाकले. सर्वात जास्त मधमाशा त्यांनाच चावल्या. त्यामुळे जास्त त्रास होऊ लागला.
उपचारादरम्यान मृत्यू
गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने अमळनेर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी ५-६ जण जखमी झाले असून, त्यांना अमळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अमोल शुक्ल यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.