---Advertisement---
शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जात. त्यामुळे शिक्षण म्हणजेच ज्ञानदान श्रेष्ठ मानले जाते . ज्ञानदानाचे कार्य प्रामुख्याने शाळेतून दिले जाते. त्यामुळे शाळेला पवित्र स्थान म्हटले गेले आहे. मात्र शाळेसारख्या या पवित्र स्थानाला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. एका खाजगी शाळेतील महिला कर्मचाऱ्याने मुख्याध्यापकांवर अत्याचार , ब्लॅकमेलिंग आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
ही लज्जास्पद घटना शिमला येथील थेओग भागात घडली आहे. पीडित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिचे आक्षेपार्ह फोटो काढले.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्या फोटोंचा वापर करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. महिलेने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की २५ मार्च रोजी जेव्हा तिने या सर्व कृत्यांना विरोध केला तेव्हा त्याने तिच्यावर बेल्टने हल्ला केला आणि २४ मे रोजी तो तिच्या खोलीत घुसला.
शिमला पोलिस अधीक्षक संजीव कुमार गांधी यांनी पीटीआयला सांगितले की, आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (शारीरिक अत्याचार), ७४ (हल्ला), ७९ (महिलेवर हल्ला), ३३२ (क) (घरात घुसखोरी), ११५ (२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी), १२६ (२) (चुकीने प्रतिबंध) आणि ३ (५) (गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.