जळगाव । शहरातील दोन हॉटेलमध्ये कुंटनखाना सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. या हॉटेलमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने आज रविवारी छापा टाकला. या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, एका बांगलादेशी तरुणीलादेखील पोलिसांनी अटक केली असून ती बेकायदा वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.
पोलीस सूत्रानुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ असलेल्या हॉटेल चित्रकूटमध्ये कुंटनखाना सुरू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या पथकाने व डमी ग्राहकांच्या मदतीने कारवाई केली असता पर्दाफाश झाला.
तसेच कारवाईत जवळच असलेल्या हॉटेल मध्येदेखील एक महिला असल्याची माहिती मिळाल्याने तिथे खात्री केली असता एक महिला आढळून आली. पोलिसांनी हॉटेल चित्रकूटमध्ये आढलेल्या महिलेची चौकशी केली असता हॉटेल व्यवस्थापक विजय सखाराम तायडे याच्यामार्फत ती येथे आल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.
तसेच तिच्या सोबत असलेली दुसरी महिला हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले. तेथून व्यवस्थापक विजय तायडे याच्यासह एका तरुणीला ताब्यात घेतले. ती तरुणी बांगलादेशी असल्याचे आढळून आले. मात्र, बांगलादेशी तरुणीकडे कोणतेही दस्ताऐवज आढळून आले नाही.
हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय तायडे याच्याशी बांगलादेशी तरुणीचा संपर्क झाला व देहव्यापारातून तिला पैसे दिले जाणार असल्याचे सांगून तिला येथे आणले असल्याची माहिती सदर तरुणीने पोलिसांना दिली. तिच्याजवळ एक मोबाईलही आढळून आला. याप्रकरणी पोकॉ गोपाल पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नीलेश गुजर, चेतन माळी, विजय तायडेसह बांगलादेशी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.