सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तारकर्ली येथे समुद्रात बुडून पुणे, हडपसर येथून आलेल्या दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. तर एक युवक गंभीर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज (दि. २२) सकाळी ११:२० वाजताच्या सुमारास तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रकिनाऱ्यावर घडली.
पुण्यातील हे युवक तारकर्ली समुद्रकिनारी पर्यटनासाठी आले होते. सकाळी ते समुद्रात स्नानासाठी उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा आणि लाटांच्या तीव्रतेचा अंदाज न आल्याने ओंकार भोसले, रोहित कोळी आणि शुभम सोनवणे पाण्यात ओढले गेले. घटनास्थळी उपस्थित स्थानिक मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांनी त्वरित बचावकार्य हाती घेतले. बोटीच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली गेली.
काही वेळानंतर तिन्ही युवकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी रोहित कोळी आणि शुभम सोनवणे यांना मृत घोषित केले. तर ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून, अधिक चांगल्या उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या वेळी समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण तसेच रांजेश्वर वॉटर स्पोर्ट्सचे कर्मचारी यांनी तातडीने मदतकार्य हाती घेऊन बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.मालवण पोलीस स्थानकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.
मृत तरुण
रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) – पुणे
शुभम सुनील सोनवणे (वय २२) – पुणे
जखमी तरुण
ओंकार अशोक भोसले (वय २४) – पुणे (अत्यवस्थ)
कुश संतोष गदरे (वय २१) – हवेली, पुणे
रोहन रामदास डोंबाळे (वय २०) – हवेली, पुणे