रावेर : जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरीय जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जळगाव येथील भाऊसाहेब गंधे सभागृहात पार पडला. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक अशा १५ शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. रावेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुनखेडे येथील उपक्रमशील उपशिक्षक, राज्यातील पहिल्या गुलाबी गावाचे प्रणेते जितेंद्र रमेश गवळी यांना जळगाव जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायटचे प्राचार्य अनिल झोपे, नीलकंठ गायकवाड साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
जितेंद्र गवळी यांनी मुलींच्या शिक्षणासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी, गावातील एकजुटीसाठी एक गांव, एक रंग उपक्रम यशस्वीपणे राबवून नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात राज्यातील पहिले गुलाबी गांव निर्माण केले होते. जिथे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी स्वतः भेट दिली होती. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गुलाबवाडी या गावात ही त्यांनी गुलाबी गांव प्रकल्प राबविला होता.
राज्य निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक त्यांनी प्राप्त केला होता. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ही त्यांचा द्वितीय क्रमांक आला होता. कोरोना कालावधीत त्यांनी झेड पी लाईव्ह एज्युकेशन ऍप्प च्या माध्यमातून राज्यातील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी ऑनलाईन शिक्षण पोहोचविले होते. या कार्याबद्दल त्यांना माय एफ एम व LIC कडून राज्यस्तरीय जियो दिल से अवॉर्ड प्राप्त झाला होता. अशा गुणी व उपक्रमशील शिक्षकाला यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण तालुक्यातून आनंद व्यक्त केला जात आहे. सर्व शिक्षक मित्र व अन्य मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.