---Advertisement---

Rabi crops : बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात, शेतकऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

by team
---Advertisement---

 Rabi crops शिरपूर : परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. नुकतेच लागण केलेले कांदा पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषधी फवारणीला वेग आला आहे. काही शेतकऱ्यांनी कोवळ्या पिकावरच औषध फवारणी केल्याने ती धोक्यात आली आहेत, तर याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

वातावरण स्वच्छ नसल्याने याचा परिणाम पिकांवर होऊन लागवड केलेले रब्बी हंगामातील पीक हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तालुक्यातील तऱ्हाडीसह परिसरात यंदा रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या हंगामात शेतकरी मूग, हरभरा, ज्वारी, उडीद, गहू या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, गवार, टोमॅटो, मेथी, पालक आदी भाजीपाला पिके घेतात. रंब्बी हंगामात बहुतेकदा खरीप हंगामातील आर्थिक तूट भरून काढली जाते. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची लवकर मळणी उरकून ज्वारीची लागवड केली. जमिनीला पुरेसा ओलावा असल्याने काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. गहू, ज्वारी, मूग आदी पिके बहरात असून, हरभरा फुलोऱ्यात आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली असून, जोमाने उगवण, लागण झालेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतित आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून काही शेतकऱ्यांनी झेंडू लागवड केली आहे. असे असताना ढगाळ वातावरण व दाट धुक्याचा परिणाम झेंडू रोपांच्या वाढीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज
यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडीची चाहूल लागली. मात्र, सध्या अचानक तयार होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे हवेतील थंडीचे प्रमाण कमी होत आहे. सद्यःस्थितीत ढगाळ वातावरण होत असल्याने पिके पिवळी पडून रोगाला बळी पडत आहेत. कांदा पिकावर मावा, रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आहे, तर गहू पिवळा पडत आहे. पिकांवर महागड्या औषधांची फवारणी केल्यानंतरही फारसा फायदा होणार नाही, असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.


वारंवार वातावरणामध्ये बदल होत असून, कमी-अधिक थंडी, तर कधी ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. थंडीचे कमी-अधिक प्रमाण होत असल्याने रब्बी हंगामातील पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली असून, मूग, उडीद, हरभरा आदी पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.

– राजेंद्र गिरधर बोरसे (शेतकरी, तऱ्हाडी, ता. शिरपूर)

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment