जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दम’धार’; आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज

जळगाव : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये चांगलाच तडाखा दिला. सलग दुसऱ्या दिवशी पारोळा, धरणगाव व चाळीसगाव तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला.

जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली. विशेष म्हणजेच यंदा जळगाव शहर वासियांची तहान भागविणारे वाघूर धारणासह जिल्ह्यातील एकूण ७ धरणांनी शंभरी गाठली आहे. तर दोन धरण शंभरच्या उंबरवठ्यावर आले. यामुळे जळगावकरांची पाणी टंचाईची चिंता मिटली आहे.

बुधवारी रात्री जामनेर, पाचोरा व भडगाव तालुक्यांमध्येही परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.

यंदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली होती. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी जिल्ह्यात १७ मिमी पाऊस झाला होता तर बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यात २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात सर्वाधिक ४४.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली तर पाचोरा तालुक्यातही ३७ मिमी पाऊस झाला. पारोळा तालुक्यात ४० मिमी पाऊस झाला. पारोळा तालुक्यात मंगळवारी ४५ मिमी पाऊस झाला होता. शेवटच्या दोन दिवसांत पारोळा तालुक्यात एकूण ८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आणखी दोन ते तीन दिवस पाऊस राहील, असा अंदाज आहे.