---Advertisement---
किडनीसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रावेर ग्रामीण रुग्णालयात शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक जागा रुग्णालय परिसरात उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे रावेर शहरासह परिसरातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी डायलिसिससाठी रुग्णांना जळगावपर्यंत जावे लागत होते. त्यामुळे वेळ, प्रवासाचा त्रास आणि आर्थिक खर्च या तिन्ही अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता ही सेवा थेट रावेर ग्रामीण रुग्णालयातच उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठी सोय होणार आहे. विशेष म्हणजे, या परिसरातील हे पहिलेच शासनमान्य डायलिसिस सेंटर असणार आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिससाठी मोठा खर्च करावा लागत असतो. परंतु शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सर्वसामान्य रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे.
या संदर्भात आ. अमोल जावळे म्हणाले, “रावेर आणि परिसरातील नागरिकांसाठी शासनमान्य डायलिसिस सेंटर ही मोठी सुविधा आहे. आरोग्य सेवेच्या दृष्टीने हे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. रुग्णांना आता जळगावपर्यंत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. ग्रामीण रुग्णालयात आधुनिक सोयींनी युक्त हे केंद्र सुरू होणार असून, पुढील काळात आणखी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.”
या निर्णयामुळे रावेर, यावल, फैजपूर, मुक्ताईनगर तसेच परिसरातील किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना थेट लाभ होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे परिसरातील नागरिक आणि रुग्णांनी स्वागत केले असून, आमदार अमोल जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.









