अश्वारुढ पुतळ्यासंदर्भात आज मनपात बैठक

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून मनपातील पदाधिकारी व अधिकारी यांच्यात सामंजस्य नसल्याने थांबलेल्या पिंप्राळा येथील मुख्य चौकात उभारण्यात येणारा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याचे प्राप्त झालेल्या क्ले मॉडेलमधून सुयोग्य मॉडल निश्चित करण्यासाठी सोमवार, 14 रोजी महापौरांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मनपा क्षेत्रामध्ये पिंप्राळा येथील मुख्य चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा उभारणे कामी ई निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या निविदेतील अटी-शर्ती नुसार 7 नोव्हेंबर 2022 रोजी क्ले मॉडेल व संकल्पना सादरीकरण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. या मुदतीत एकूण 06 शिल्पकार यांनी क्ले मॉडेल सादर केलेले आहेत. या क्ले मॉडेलपैकी सुयोग्य क्ले मॉडेल निश्चिती करण्यासाठी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या 7 नोव्हेंबरच्या सूचनेनुसार समिती गठित करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये असलेल्या सर्व सदस्यांची 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु ती बैठक झाली नाही. या कामाच्या निविदा प्रक्रियेस मुदतवाढ देण्यास आयुक्त यांनी मान्यता दिली. त्यावरून ही बैठक आता सोमवार, 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता मनपा प्रशासकीय इमारत 17 वा मजला महापौरांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे.