जळगाव । शहरात अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अवजड वाहनांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. यात आकाशवाणी चौक ते टॉवर चौकादरम्यान अवजड वाहनांसाठी विशिष्ट वेळा निर्धारित केल्या आहेत.
शहरातील वाहने आणि नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, विशेषत: आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन पावेतो जाणाऱ्या मार्गावर, ज्यावर अनेक महत्त्वाची सार्वजनिक सुविधा आणि व्यावसायिक केंद्रे आहेत. यामुळे येथे वाहतूक कोंडी आणि अपघाताची समस्या निर्माण झाली आहे.
नवीन नियमांच्या अंतर्गत, अवजड वाहने (मालवाहतूक करणारी) आकाशवाणी चौक ते टॉवर चौक-नेरी नाका-स्वातंत्र्य चौक या मार्गावर सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत आणि रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच ये-जा करू शकतील. याशिवाय, सर्व खाजगी बसेस आणि लक्झरी बसेस यांना शहराच्या मुख्य मार्गांवर प्रवेश बंदी केली आहे.
हरकती आणि सूचना
तसेच, शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत, कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून याबद्दल हरकती किंवा सूचना सादर करता येतील, ज्यावर पोलीस अधीक्षक, जळगाव विचार करतील.