दरवर्षी दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्याच निमित्तानं एसटी महामंडळाच्या वतीने हंगामी भाडेवाढ करण्यात येत असते. यंदाही एसटी महामंडळाची ही भाडेवाढ प्रस्तावित होती. परंतु राज्यातील एसटी प्रवाशांना दिलासा देता यावा, यासाठी राज्य सरकारच्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा दिवाळीदरम्यान करण्यात येणारी हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतचा निर्णय महायुती सरकारने रद्द करीत राज्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीत निवडणुकांची आणि प्रचारांची धामधूम सुरू असणार आहे. दरम्यान दरवर्षी दिवाळीला अनेक लोक आपल्या घरी जातात. त्यासाठी काही प्रवासी रेल्वेने तर काही परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. दरवर्षी एसटी महामंडळाकडून 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. यंदाही ही भाडेवाढ 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान करण्याचे परिपत्रक काढण्यात आले. परंतु सरकारच्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा दिवाळीदरम्यान करण्यात येणारी हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोणत्याही बसमध्ये भाडेवाढ नसणार
एसटीने हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम यंदा जमा होणार नाही. एसटीला दिवाळीच्या काळात चांगले उत्पन्न मिळते. यावर्षीही उत्पन्न वाढीसाठी हा मार्ग स्वीकारला होता. परंतु आता भाडेवाढ करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी भाडेवाढ लागू असणार नाही.
राज्य सरकारने 11 ऑक्टोबर रोजी काढलेल्या एका परिपत्रकानुसार राज्यात 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीतील गर्दीचा हंगाम लक्षात घेता परिवर्तनशील भाडेवाढ करण्याबाबत सूचना सर्व एसटी आगारांना देण्यात आल्या होत्या. मात्र आता ही भाडेवाढ रद्द करण्याचे नवे परिपत्रक एसटी महामंडळाने जारी केले असून, परिपत्रकानुसार सध्य असलेल्या प्रति टप्पादराप्रमाणेच भाडे आकारणी करण्यात यावी, अशा सूचना एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक यांनी दिल्यात.