जळगाव : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे शासनाचे १० कोटींचे नुकसान झाल्याचा ठपका आयकर विभागाकडून ठेवण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने करचुकवेगिरी करीत शासनाता चुना लावला आहे. आयकर विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत हा प्रकार समोर आला आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने टीडीएसचा घोळ करत शासनाचे तब्बल कोट्यावधी रुपयांचे नुकसान केल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्यानुसार नाशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विद्या रत्नकिशोर यांच्या मार्गदर्शनात नाशिक, पुणे आणि जळगावच्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (२२ जानेवारी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात छापा टाकला होता. हे तपास पथक सकाळी दहाच्या सुमारास महाविद्यालयात दाखल होत रात्री उशिरापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठाण मांडून होते. पथक अचानक दाखल झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची भंबेरी तर उडालीच यासह या छाप्यात अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत.
यात शासकीय वैद्यकीय म हाविद्यालय प्रशासनाने ४४८ कोटीची देयके, तर आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयाने १४.४२ कोटींची देयके एचएससीसी इंडिया लिमिटेड या कंपनीला अदा केली आहेत. या देयकांवर महाविद्यालय प्रशासनाने कुठल्याच प्रकारचा टीडीएस कापण्यात आलेला नाही. ही कपात न केल्याने शासनाचे तब्बल १० कोटींचे नुकसान झाले आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जिल्ह्यासाठी मेडिकल हब मंजूर झाले आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी शासनाने १२०० कोटींचा निधीदेखील मंजूर केला आहे.
त्यानुसार चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू आहे. ते काम एचएससीसी इंडिया लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. या कामासंदर्भात म हाविद्यालय प्रशासनाने ४४८ कोटींची देयके अदा केली आहेत. मात्र, ही देयके अदा करताना कोणत्याही प्रकारचे टीडीएस कापण्यात आलेला नाही. महाविद्यलयाच्या या बेजबादारपणामुळे शासनाचे तब्बल १० कोटींचे नुक्सान झाले असल्याचे समोर आले आहे.