महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनाची शालेय सुट्टी रद्द; शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई: 26 जानेवारी हा दिवस देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रजासत्ताक दिनासंदर्भात महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात यावर्षीपासून शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनी असणारी सुट्टी यापुढे दिली जाणार नाही. याबाबत शालेय शिक्षण विभागाने सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सूचना दिली आहे की, या दिवशी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जावेत.महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात असे निर्देश देण्यात आले आहेत की, 26 जानेवारीला शाळांमध्ये विविध स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करावेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली जाईल. यामध्ये ध्वजारोहणानंतर प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य, चित्रकला, निबंध आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. हे सर्व कार्यक्रम देशभक्तीच्या थीमवर आधारित असावेत.

शालेय शिक्षण विभागाने शाळांमध्ये 26 जानेवारीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले असून, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे आता 26 जानेवारी हा दिवस विद्यार्थ्यांना सुट्टी घेण्याऐवजी शाळेत सहभागी होऊन देशभक्तीपर कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा आणि राष्ट्रप्रेमाची भावना साजरी करण्याचा दिवस बनणार आहे.