तरुण भारत ।३० डिसेंबर। रुडकी : भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू पंतच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येतंय. दिल्लीहून घरी जात असताना उत्तराखंडमधील रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या अपघातात ऋषभला प्रचंड मार लागल्याचं सांगितलं जात आहे. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे.
सूत्रानुसार, ऋषभ पंत दिल्लीहून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला. ऋषभची कार रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथील एका वळणावर रेलिंगला धडकली. कार नारसन गावात आली असता कारचालकाचं गाडीवरील ताबा सुटला आणि रेलिंग तसेच खांबांना धडक देत कार पलटी झाली. ही धडक अत्यंत जोरदार होती. त्यामुळे कारला भीषण आग लागली. बघता बघता कार जळून खाक झाली. या कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. त्यामुळे हा अपघात किती भीषण होता हे दिसून येतं. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली.
पंतला मोठा मार लागला
या अपघातात ऋषभ पंतला मोठा मार लागला आहे. त्याच्या कपाळावर जबर मार लागला आहे. शिवाय ऋषभच्या पाय आणि पाठीलाही भीषण मार लागला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभला दिल्ली रोड येथील सक्षम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
ऋषभची प्रकृती स्थिर
ऋषभची प्रकृती स्थिर असल्याचं सक्षम रुग्णालयाचे चेअरमन डॉय सुशील नागर यांनी सांगितलं. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पोलीस घटनास्थळी दाखल
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक देहात स्वप्न किशोर सिंह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेचा पंचनामा सुरू केला असून अधिक तपास सुरू आहे.