छत्रपती संभाजीनगर : पुरोगामी समजण्यात येणाऱ्या महाराष्ट्रात दुर्दैवी घटना घडली आहे. एका मुलीचे दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम केल्याची शिक्षा तिच्या भावानेच तिचा जीव घेऊन दिली आहे. यात मुलीच्या भावाने तिला 200 फूट उंच टेकडीवर नेऊन ढकलले. यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाने आपल्या बहिणीने प्रेम केल्याने तिला मोठी शिक्षा दिली. त्याने तिला 200 फूट उंच कड्यावरून दरीत ढकलून दिले. यात ती दुर्दैवी मुलगी जागीच ठार झाली. ती केवळ 17 वर्षांची होती. आरोपी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुलगी आरोपीची चुलत बहीण असल्याचे समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आलेल्या मुलीचे दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीय या प्रेमा विरोधात होते. प्रेम संबंध तोडण्यासाठी मुलींवर वारंवार दबाव टाकण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून मुलीने पोलिसात तक्रार देखील केली. यात तिने तिच्या घरच्यांपासून आपल्या जीवितास धोका असल्याचे म्हटले होते.
या घटनेनंतर कुटुंबीयांकडून मुलीला समज देण्यासाठी गावापासून दूर तिच्या मामाच्या गावी म्हणजेच वडगाव, संभाजीनगर येथे पाठविण्यात आले. तेथे काकाचा मुलगा ऋषिकेश याला त्याच्या चुलत बहिणीवरील प्रेम प्रकरण समजले. त्याला याचा एवढा राग आला की त्याने तिची हत्या केली. ऋषिकेशने मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने आधी डोंगरावर नेले आणि नंतर तिथे ढकलले, त्यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी हृषिकेश तानाजी शेरकर (वय 25) याने आपल्या 17 वर्षीय चुलत बहिणीला डोंगरावरून ढकलून मारले. डोंगराच्या खाली क्रिकेटचा सामना चालू होता. बहिणीला डोंगरावरून ढकलून तो डोंगरावरून खाली येत असताना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून भावाला अटक केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.