---Advertisement---

Jalgaon News: सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आमदार खडसेलेवा पाटीदार समाजाच्या सोहळ्यात 23 वधू-वरांचे शुभमंगल

by team
---Advertisement---

Jalgaon News : सध्या विवाहांमध्ये होणारा खर्च टाळण्यासाठी सद्यःस्थितीत सामूहिक विवाह सोहळा ही एक काळाची गरज बनली आहे. समाजाची बांधिलकी जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन आपले योगदान दिले पाहिजे. वधू-वरांनी भविष्यात कुरबुरी न करता समजंसपणे संसार करावा, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विधान परिषदेचे सदस्य एकनाथ खडसे यांनी केले.
लेवा एज्युकेशनल युनियन (जळगाव), अखिल भारतीय लेवा युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड (जळगाव) यांच्यातर्फे रविवारी (23 मार्च) सकाळी लेवा पाटीदार समाजातील वधू- वरांचा सामूहिक विवाह सोहळा शहरातील लेवा बोर्डिंगच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. सोहळ्यामध्ये 23 वधू-वरांचा सहभाग होता. लेवा पाटीदार समाजात 1995 नंतर मोठ्या प्रमाणात सामूहिक विवाह सोहळे जळगाव शहरात घेण्यात आले.

आमदार एकनाथ खडसे अध्यक्षस्थानी होते. विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, कुटुंबनायक ललित पाटील, भोरगाव लेवा पंचायतीचे सचिव ॲड. संजय राणे, लेवा एज्युकेशनल युनियनचे उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सचिव प्रा. व. पु. होले, ॲड. प्रकाश पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा केतकी पाटील, माजी महापौर आशा कोल्हे, सिंधू कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ॲड. केतन ढाके आदी उपस्थित होते.

सुरुवातीला चिमुकले राममंदिरापासून नवरदेवांची वरात वारकरी संप्रदायामधील वारकऱ्यांच्या दिंडीसोबत सकाळी दहाला निघाली होती. मार्गात पावली खेळून वऱ्हाडी मंडळींनी उत्साह आणला. नंतर विवाहस्थळी लेवा बोर्डिंग येथे नवरदेवांचे स्वागत करण्यात आले. मंडपात आल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात सर्व 23 जोडप्यांचा विधिवत विवाह सोहळा पार पडला. यानंतर दीपप्रज्वलन करीत देवतांसह समाजातील मान्यवरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.

या वेळी ॲड. संजय राणे यांचा नुकताच परदेशात उच्चस्तरीय सन्मान देऊन गौरव करण्यात आल्याबद्दल समाजातर्फे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. आमदार भोळे म्हणाले की, उपक्रम कौतुकास्पद असून, प्रत्येक समाजात विवाह सोहळ्यातील वाढत्या अनिष्ट रूढी आणि पैशांचा व वेळेचा अपव्यय बघता, समाजमंडळांनी अशा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. यातून गोरगरीब परिवारातील उपवर मुलामुलींचे विवाह अल्पखर्चात पार पडतात. यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होते, असेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी सर्व वधू- वरांना संसारासाठी लागणारे आंदण (भांडी) व इतर गृहोपयोगी वस्तू देण्यात आल्या. ॲड. संजय राणे यांनी प्रास्ताविक केले. स्वाती भोळे आणि वैशाली झोपे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. प्रकाश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी लेवा एज्युकेशनल युनियन, जळगांव, अखिल भारतीय लेवा युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड, जळगांव यांचे कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

साधनसंपन्न व्यक्तींनीही पुढे यावे : कुटुंबनायक पाटील

सामूहिक विवाह संमेलनातून सामाजिक हित साधले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मदत आणि आधार देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. समाजातील मोठ्या, साधनसंपन्न व्यक्तींनीही आपल्या कुटुंबातील मुलामुलींच्या विवाहासाठी अशा संमेलनांमध्ये पुढे यावे, असे आवाहन यावेळी कुटुंबनायक ललित रमेश पाटील यांनी केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment