---Advertisement---
छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा आरोप समोर आला आहे. अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर समृद्धी महामार्गाशी संबंधित जमीन प्रकरणात तब्बल 1,150 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. जटवाडा परिसरातील 23 एकर 30 गुंठे जमीन ड्रायव्हरच्या नावावर ‘हिबानामा’ करून बळकावल्याचा दावा दानवे यांनी केला असून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दानवे यांच्या आरोपानुसार, संबंधित जमीन भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर ‘हिबानामा’ म्हणजेच बक्षीस पत्राद्वारे हस्तांतरित करण्यात आली. मात्र या हिबानाम्याची नोंद 1971 सालची दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दानवे यांनी उपस्थित केलेला मुख्य मुद्दा म्हणजे जावेद रसूल शेख यांचा जन्म 1985 मध्ये झाल्याचे सांगितले जात असून, मग 1971 मध्ये त्यांच्या नावावर जमीन कशी हस्तांतरित होऊ शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हे प्रकरण मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. जटवाडा येथील जमीन महाराष्ट्र विकास मंडळाकडून संपादित करण्यात आल्याचे नमूद केले जाते. समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन प्रक्रियेनंतर संबंधित जमिनीचे मूल्य सुमारे 1,150 कोटी रुपये निश्चित करण्यात आल्याचा दावा आहे. या मोबदल्यासाठी मालकी हक्काचा दावा करून मोठी रक्कम मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी दानवे यांनी सविस्तर कागदपत्रांसह मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशी झाल्यास संपूर्ण सत्य बाहेर येईल, असा त्यांचा दावा आहे.
दरम्यान, या आरोपांवर खासदार संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. असा कोणताही हिबानामा झालेला नाही. जावेद रसूल हा माझा ड्रायव्हर आहे, मात्र त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आरोपात उल्लेख केलेला जावेद हा दुसराच कोणी असू शकतो. अंबादास दानवे यांनी आपले आरोप सिद्ध करून दाखवावेत,” असे भुमरे यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. प्रकरणाची अधिकृत चौकशी होते का आणि त्यातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









