धरणगाव : पुण्याहून जळगावकडे येणाऱ्या जळगाव येथील संगीतम ट्रॅव्हल्सच्या ७७७३ क्रमांकाच्या बसने रविवारी रात्री अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय केली. या बसला नाशिक फाटा येथे आणि पुन्हा मोशी येथे टेक्निकल बिघाड झाला. रात्री १२:३० वाजता अचानक गाडी कॅन्सल झाल्याचा मेसेज सर्व प्रवाशांना आला. मात्र, त्या मेसेजमध्ये रिफंड किंवा पर्यायी सोय याबाबत काहीही उल्लेख नव्हता.
बसमध्ये २५-२६ प्रवासी होते, त्यापैकी ५०% महिला होत्या. काहीजण लहान मुलांसह प्रवास करत होते. बस चालकाने रात्री ३.३० वाजता सर्व प्रवाशांना मोशी फाटा येथे सोडले आणि गुपचूप निघून गेला.
हेही वाचा : अनैतिक संबंध : नवऱ्याचा काटा काढण्याचं ठरवलं अन् प्रियकरालाही गमावून बसली महिला, नेमकं काय घडलं?
व्यवस्थापनाचा ठणठणाट, फोन करूनही प्रतिसाद नाही
बस बंद पडल्यावर प्रवाशांनी संगीतम ट्रॅव्हल्सच्या मॅनेजर व मालकाला सतत फोन केले, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. प्रवासी रात्रीच्या अंधारात रस्त्यावर अडकले असताना कंपनीकडून मदतीचा एकही प्रयत्न झाला नाही.
संगीतमच्या इतर गाड्याही थांबल्या नाहीत.
विशेष म्हणजे, अडचणीत सापडलेल्या प्रवाशांनी संगीतम ट्रॅव्हल्सच्या इतर गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याही बसने थांबण्याची तसदी घेतली नाही. चालकांनी थेट प्रवाशांकडे दुर्लक्ष केले आणि गाड्या वेगाने पुढे नेल्या. त्यामुळे अनेक प्रवासी अजूनच अडचणीत आले.
“आम्ही गाडीत बसलो तेव्हा काही अंदाज नव्हता, की असं होईल. रात्री ३.३० वाजता रस्त्यावर उभं राहणं म्हणजे धोकादायक आणि असुरक्षित होतं.”- संध्या कुलकर्णी, प्रवासी
“बसवाल्यांनी निदान पर्यायी सोय तरी करायला हवी होती. किमान रिफंड तरी मिळाला पाहिजे. कंपनीच्या व्यवस्थापकांनी फोन घेतले असते तर आम्हाला काहीतरी दिशा मिळाली असती.”- अमोल पाटील, प्रवासी