जळगाव : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ दरम्यान गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक महोत्सवाला देश-विदेशांतून सुमारे २५,००० धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार असून, जळगाव जिल्ह्यातूनही ४०० हून अधिक साधक गोव्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी आज गुरुवारी सकाळी जळगाव रेल्वे स्थानकावरून १०० हुन अधिक गोवा एक्सप्रेसने साधक रवाना झाले.यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवात रामराज्याची संकल्पना मूर्त स्वरूपात साकार करण्याच्या दिशेने पाऊल उचलले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ‘धर्मेण जयति राष्ट्रम्’ या घोषवाक्यानुसार सनातन राष्ट्र निर्माणासाठी जनजागृती करणे हा आहे. यासाठी एक कोटी रामनामाचा जपयज्ञ, संतसभा, विविध अध्यात्मिक संस्था आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकत्रिकरण घडवण्यात येणार आहे.
या दिव्य शंखनादासाठी संत, महंत, विचारवंत, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांसह हिंदुत्वासाठी कार्य करणारे मान्यवर उपस्थित राहणार असून, गुरुदेव श्री श्री रविशंकर, स्वामी रामदेव, स्वामी गोविंददेव गिरी, देवकीनंदन ठाकुर, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, डॉ. प्रमोद सावंत, सुरेश चव्हाणके यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
हिंदु राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री पुरस्कार वितरण
छत्रपती शिवाजी महाराज कालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि गोमंतकातील लोककला सादरीकरण
दहा हून अधिक संतांच्या पादुकांचे दर्शन
१९ मे रोजी महाधन्वंतरी यज्ञाचे आयोजन
सनातन संस्थेचे श्री. वसंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “ही शंखध्वनी केवळ अध्यात्मिक जागृतीसाठी नसून भारताच्या अंतर्गत व बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी धर्माधिष्ठित राष्ट्राची आवश्यकता अधोरेखित करणारी आहे.”