जळगाव: जिल्हा परिषद समोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद जळगाव शाखेच्या वतीने १५ जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आलेले आमरण उपोषणाची आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार राजुमामा भोळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली. या उपोषणात १४ शिक्षक व शिक्षिका सहभागी होते, ज्यांनी अधिसंख्य पदावर वर्ग करण्यापूर्वी निवड श्रेणीस पात्र असलेल्या शिक्षकांना निवड मंजूर करण्याची मागणी केली होती.
यावेळी उपोषणार्थीना अन्यायी समस्येबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव यांचेकडे मार्गदर्शन मागविण्यात आल्याचे पत्र देण्यात आले. आमरण उपोषणाची सांगता करतांना आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार राजुमामा भोळे यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना सुचना केल्या. आमरण उपोषणास बसलेल्या शिक्षकांची मागणी रास्त व न्यायीक असून संबंधित उपोषणाला बसलेले शिक्षक व शिक्षिका हे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यापूर्वी निवड श्रेणीस पात्र आहेत. यात जिल्हा परिषद जळगांव प्रशासनाची चुक आहे.
वेळीच निवड श्रेणी प्रक्रिया राबविली असती तर आज या शिक्षकांना आमरण उपोषणास बसण्याची वेळ आली नसती, ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषद जळगाव प्रशासनाने शासनाकडे सादर केलेल्या मार्गदर्शन पत्रानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी तातडीने अवर सचिव यांचेशी संपर्क साधुन अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय द्यावा.
महाराष्ट्र तसेच या बाबत ग्राम विकास विभागाचे अवर सचिव यांचेशी आम्ही स्वतः संपर्क करणार असुन पुढील आठवड्यात ग्रामविकास मंत्री व अवर सचिव यांची भेट घेऊन अन्यायग्रस्त शिक्षकांच्या समस्येबाबत तातडीने निर्णय घेऊन त्यांना न्याय देण्याबाबत जिल्हा परिषद जळगांव प्रशासनास लेखी पत्र द्यावे. अश्या स्वरुपाची चर्चा मंत्रालयात करणार आहोत व लवकरच अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून दिला जाईल असे सांगितले. व आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.