---Advertisement---
जळगाव : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. १६ जानेवारीनंतर महापालिकेचा १६ वा महापौर निश्चीत होणार असून, आत्तापर्यंत महापालिकेत सात महिलांनी महापौर पद भूषविले आहे. यात प्रथम महापौर म्हणून आशाताई कोल्हे यांनी सर्वाधिक अडीच वर्ष कार्यकाळ सांभाळला होता.
महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरूवात होणार आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची तयारी अंतीम टप्प्यात आहे.
तर दुसरीकडे राजकीय पातळीवर देखील पक्षांच्या मुलाखतींचा टप्पा पार पडला आहे. आता वेध लागले ते उमेदवार निश्चीतीचे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
महापालिकेतील खान्देश विकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात
सन २००३ मध्ये तत्कालीन नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. त्यानंतर अधिकचा निधी मिळण्यासाठी राजकीय घडामोडी घडल्या. जळगाव महापालिकेत पक्षाची सत्ता आली की निधी मिळण्यात मोठ्या अडचणी येतात. ही बाब लक्षात घेता माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या संकल्पनेनुसार महापालिकेत खान्देश विकास आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीचे नेतृत्व माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेत कार्यरत होते. महापालिकेतील प्रत्येक नगरसेवकाला मानाचे महापौर पद भूषविता यावे यासाठी सहा-सहा महिन्यांचा फॉर्म्युलाही काही काळ अंमलात आणण्यात आला होता. त्यामुळे महापौर पदाची लॉटरी अनेकांना लागली.
१५ पैकी सात महिला होत्या महापौर
१५ स्थापनेपासून ते आतापर्यंत जळगाव महापालिकेचे महापौरपद नगरसेवकांनी भूषविले. त्यात सात महिलांचा समावेश होता. महिलांना प्राधान्य देत शहराच्या प्रमुखपदी बसविण्याच्या संकल्पनेला महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा दिला होता. २१ सप्टेंबर २००३ मध्ये प्रथम महापौर म्हणून ज्येष्ठ नगरसेविका आशाताई कोल्हे यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी २० मार्च २००६ पर्यंत महापौर पद भूषविले होते. त्यानंतरच्या काळातही महिला नेतृत्वाला प्रमुखपदाची संधी देण्यात आली.
१६ व्या महापौराची प्रतीक्षा
महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. १६ जानेवारीनंतरच महापालिकेचे १६ वे महापौर निश्चीत होणार आहे. जळगावकरांना अजून महिनाभर तरी महापौरपदाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महापौर आणि त्यांचा कार्यकाळ
आशा कोल्हे : २१ सप्टेंबर २००३ ते २० मार्च २००६
तनुजा तडवी : २१ मार्च २००६ ते २० सप्टेंबर २००८
रमेश जैन: २२ सप्टेंबर २००८ ते २८ ऑक्टोबर २००९
प्रदीप रायसोनी : ३० नोव्हेंबर २००९ ते २१ मार्च २०११
अशोक सपकाळे २२ मार्च २०११ ते ५ सप्टेंबर २०११
सदाशिव ढेकळे : २० सप्टेंबर २०११ ते २० मार्च २०१२
विष्णू भंगाळे : ४ एप्रिल २०१२ ते २० सप्टेंबर २०१२
जयश्री धांडे ३ ऑक्टोबर २०१२ ते १५ मार्च २०१३
किशोर पाटील: २८ मार्च २०१३ ते १९ सप्टेंबर २०१३
राखी सोनवणे : २० सप्टेंबर २०१३ ते ९ मार्च २०१६
नितीन लढा : १० मार्च २०१६ ते २३ जुलै २०१७
ललित कोल्हे : ७ सप्टेंबर २०१७ ते ऑगस्ट २०१८
सीमा भोळे: १८ सप्टेंबर २०१८ ते ७ जानेवारी २०२०
भारती सोनवणे : २७ जानेवारी २०२० ते १७ मार्च २०२१
जयश्री महाजन १८ मार्च २०२१ ते १७ सप्टेंबर २०२३









