अमळनेर : तालुक्यातील पिंगलेवाडे येथील आश्रमशाळेतील पहिल्यातील विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत मारवाड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद कार्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथे आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत पंकज जमादार वळवी (वय ७ वर्ष रा. केलीपाणी, ता. तळोदा, जि. नंदुरबार) हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आश्रमशाळेत दररोज सायंकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात येते. यानुसार सायंकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली असता पहिलीतील विद्यार्थी पंकज वळवी हा गैरहजर असल्याचे आढळून आले. यामुळे शाळेत एकच खळबळ उडाली. शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी घाबरलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु केली.
शाळेच्या शेजारी अतुल शरद पाटील यांचे शेत आहे. या शेतात विहीर आहे. या विहिरीत डोकावून पहिले असता पंकजचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आला. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे.
या अपघाताची ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर खाटेला दोर बांधून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यानंतर, रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेबद्दल भरत कोळी यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय राहुल बोरकर करीत आहेत.