जळगावात कार लांबवणाऱ्या चोरट्याला धुळ्यात पडल्या बेड्या

धुळे : धुळे तालुका पोलिसांनी जळगावातून चारचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून महागडी स्वीप्ट कार जप्त केली केली आहे. अशपाक शेख मुस्ताक (२५, शंभर फुटी रोड, जामचा मळा, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला चोरी केलेल्या स्वीप्ट कारसह जळगाव जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील हे पथकासह गस्तीवर असताना धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील शिरूड चौफुलीजवळ बुधवार, १४ ऑगस्ट रोजी रात्री वाहनांची तपासणी सुरू असताना संशयीत कारसह आल्यानंतर त्यास कागदपत्रांची विचारणा केली असता पोलिसांना संशय आला. संशयीत अशपाक शेख मुस्ताक यास खोलवर विचारणा केल्यानंतर त्याने जळगाव येथून कार लांबवल्याची कबुली दिली. जळगावातील बिपीन मनोजकुमार कावडीया (३१, गणेश नगर, इंडिया गॅरेज रोड, जळगाव) यांची कार (एम.एच.१९ बी.यु.३१७८) ही ९ ऑगस्ट रोजी चोरी झाल्याबाबत जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल होता शिवाय धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला वायरलेसद्वारेदेखील माहिती कळवण्यात आली होती.

त्यानुषंगानेही तालुका पोलिसांनी महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू केल्यानंतर संशयीत गवसला. यांनी केली कारवाई ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील, हवालदार किशोर खैरनार, हवालदार अविनाश गहिवड, हवालदार कुणाल पानपाटील, हवालदार उमेश पाटील, कॉन्स्टेबल विशाल पाटील, कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, कॉन्स्टेबल धीरज सांगळे आदींच्या पथकाने केली.