Shahada Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीस सक्तमजुरीची शिक्षा

---Advertisement---

Shahada Crime शहादा: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी युवराज ओजना वसावे याला १० वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला आणखी तीन महिने सक्तमजुरी भोगावी लागेल.

अशी घडली घटना


ही घटना २४ ऑक्टोबर २०१७ रोजी तळोदा तालुक्यातील मोठी राजमोही येथे घडली होती. आरोपी युवराज वसावे हा त्याची पत्नी फुलवंतीबाई सोबत ज्वारी कापणीसाठी सासरवाडीला आला होता. २६ ऑक्टोबर रोजी ज्वारी कापणी करताना आरोपीच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर रात्री जेवण करून ते दोघे झोपले. रात्रीच्या वेळी युवराजच्या सासू-सासरे मोठ्या मुलीची तब्येत पाहण्यासाठी बोनगाव येथे गेले असल्याने घरात कोणीच नव्हते. याचाच फायदा घेऊन युवराजने पहाटेच्या सुमारास पत्नी फुलवंतीबाईचा गळा आवळून खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.



२७ ऑक्टोबर रोजी सकाळी फुलवंतीबाईची काकू तिला भेटण्यासाठी घरी आली. दरवाजा उघडून पाहिले असता, फुलवंतीबाई पलंगाखाली मृत अवस्थेत आढळून आली. घटनास्थळी युवराजच्या पायातिल जखमेवर बांधलेली पट्टी आणि एक दोरी आढळून आली. पोलिसांनी तपास केला असता, युवराजने फुलवंतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी विनोद रामसिंग वळवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात युवराजविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ (खुनाचा गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक एम. डी. डांगे यांनी केला आणि शहादा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये फिर्यादी विनोद वळवी, जेकूबाई वळवी, गुंतीबाई वळवी, तसेच डॉ. सुहास सूर्यवंशी, डॉ. प्रियंका भावे, डॉ. अंकिता तवर आणि पोलीस निरीक्षक डांगे यांच्या महत्त्वपूर्ण साक्षींचा समावेश होता.



उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या महत्त्वाच्या साक्ष विचारात घेऊन, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. पथारे यांनी आरोपी युवराज ओजना वसावे याला कलम ३०४(ii) अंतर्गत दोषी ठरवले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील यशवंतराव मोरे यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास, आणखी तीन महिने सक्तमजुरी भोगावी लागेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---