---Advertisement---
---Advertisement---
शहादा : पत्नीला ‘डाकीण’ ठरवून त्रास दिल्याप्रकरणी पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी धडगाव पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जुहऱ्या बाग्या पावरा (वय ४८, रा. गेंदाचा वडपाडा, ता. धडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे जादूटोण्याचा संशय आणि जुने भांडण आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी गणश्या पावरा याचा बैल मरण पावला होता. तेव्हा आरोपींनी फिर्यादी जुहऱ्या पावरा यांच्या पत्नीवर जादूटोणा करून बैल मारल्याचा आरोप केला होता. तिला ‘डाकीण’ संबोधून त्यांनी तिच्या घरावर दगडफेकही केली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या पत्नीने धडगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या तक्रारीचा राग मनात धरून, २१ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गेंदा गावातील सेलगदा फाट्यावर आरोपींनी संगनमत करून गैरकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी फिर्यादी जुहऱ्या पावरा यांना अडवून “तुझ्या पत्नीने आमच्यावर गुन्हा का दाखल केला” असे म्हणत हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी, आरोपी क्रमांक एक असलेल्या गणश्या चमाऱ्या पावरा याने त्याच्या हातातील छोट्या कुऱ्हाडीने जुहऱ्या यांच्या डोक्यावर “तुला जिवंत सोडणार नाही” असे म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीलाही “तू डाकीणच आहेस, तुम्हांला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली.
घटनेनंतर जुहऱ्या पावरा यांनी धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गणश्या चमाऱ्या पावरा, गेंद्रा गणश्या पावरा, रशीत गणश्या पावरा आणि सुनिल गणश्या पावरा (सर्व रा. गेंदा, ता. धडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात अंधश्रद्धेतून निर्माण होणाऱ्या गंभीर गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.