---Advertisement---
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत सध्या चर्चेला उधाण आलं आहे. शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्यांच्या तब्येतीबाबत पसरलेल्या अफवांवर आता डॉक्टरांनी स्पष्ट माहिती दिली आहे.
शरद पवार यांना गेल्या काही दिवसांपासून खोकला व छातीत कफ जमा होण्याचा त्रास जाणवत होता. बारामतीतील गोविंदबाग येथे असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ कार्डिअॅक रुग्णवाहिकेतून पुण्यात हलवण्यात आलं. सध्या त्यांच्यावर रुबी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
रुग्णालयातील डॉक्टर अभिजीत लोढा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलेलं नाही, तसेच व्हेंटिलेटर किंवा कोणत्याही प्रकारचा लाईफ सपोर्ट देण्यात आलेला नाही. शारीरिक दगदगीमुळे कंजेशन झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुढील काही तासांत तपासण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समजताच अनेक कार्यकर्ते पुण्याच्या दिशेने रवाना होत असल्याचं चित्र दिसून आलं. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना नम्र विनंती करत, “शरद पवारांची तब्येत ठणठणीत आहे, त्यामुळे कोणीही रुग्णालयात गर्दी करू नये,” असं आवाहन केलं आहे.
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असंही डॉक्टर आणि कुटुंबीयांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.









