“शिंदे आणि पवार माझ्यासोबत आहेत, महाराष्ट्र आता थांबणार नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

#image_title

मुंबई : नीट योग्य नियोजन करीत महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. राज्यातील १४ कोटी जनतेला आश्वासित करू इच्छितो की, आमचे सरकार आपल्या सेवेत पारदर्शीपणे काम करेल आणि एक लोकाभिमुख सरकार देईल, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, वचननाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. बदल्याचे नाही तर, बदलाचे राजकारण आम्हाला करायचे आहे. विरोधकांच्या संख्येनुसार मूल्यमापन करणार नाही. योग्य विषय मांडले तर त्याला पूर्ण सन्मान देऊ. लोकशाही मूल्यांचे पूर्ण पालन करू, असे फडणवीस म्हणाले.

७ ते ९ मुंबईत विशेष अधिवेशन सरकार

स्थापन झाल्यावर आमदारांना शपथ देणे आणि विधानसभा अध्यक्षांची निवड करणे ही प्रक्रिया तातडीने करणं आवश्यक असल्याने, ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत मुंबईत विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. यात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाईल, विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. ९ तारखेला राज्यपालांचे अभिभाषण होईल. त्यानंतर नियमित हिवाळी अधिवेश नागपूर येथे पार पडणार आहे. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विरोधी पक्षनेता ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांचा

विरोधकांकडे विरोधी पक्षनेता नियुक्त केला जाईल, एवढे १० टक्के संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेतेपद यावेळी नसेल, याची शक्यता अधिक आहे. यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, हा विषय सभागृहातला असून, सभागृहातील कामकाज अध्यक्षांचे विशेषाधिकार असतात. नियमात जे असेल, ते तपासून विधानसभाध्यक्ष याबाबतचा योग्य निर्णय घेतील.

नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार

नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल आणि मंत्रिमंडळातील अन्य सहकारी मंत्र्यांचा शपथविधी होईल. असे फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे येत्या ७ ते ९ डिसेंबर दरम्यान होऊ घातलेल्या विशेष अधिवेशनाप्रसंगी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

एकही विरोधक दिसला नाही

मुंबईत झालेल्या महायुतीच्या दैदीप्यमान शपथविधी समारोहाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र, राजकीय विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यासारख्या दिग्गजांना वैयक्तिक फोन करून निमंत्रण दिले. मात्र, त्यांच्या खाजगी कारणांमुळे ते येऊ शकले नसावे, असे फडणवीस म्हणाले.