---Advertisement---

Shirpur News: वीज वितरणचा गलथान कारभार, लौकीमध्ये झोपडीतील वृद्धेच्या हाती चक्क 83 हजारांचे देयक

by team

---Advertisement---

Shirpur News: महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार सर्वश्रृत आहे. अशात शिरपूर तालुक्यातून एक धक्कादाक प्रकार समोर आला आहे. याठीकाणी महावितरणच्या गलथान कारभाराचे नवे पराक्रम घडविला आहे. महावितरणने झोपडीत वास्तव्य करणाऱ्या आणि एक बल्ब व एक पंखा वापरणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेला तब्बल 82 हजार 100 रुपयांचे वीज देयक दिले. गेल्या महिनाभरापासून वीज वितरणकडे लेखी तक्रार केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलैचे एक हजार 160 रुपये जोडून 83 हजार 260 रुपयांचे वीज देयक पाठविण्याचा प्रताप देखील प्रशासनाने केला आहे. या प्रकारावरुन वीज वितरणच्या गलथान काराभावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

तालुक्यातील लौकी शिवारात जितेंद्र हिरालाल भिल एका झोपडीत कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. त्यांच्यासमवेत 70 वर्षीय आई, पत्नी आणि दोन मुले राहतात. वीज मिळावी यासाठी त्यांनी आई इंदूबाई हिरालाल भिल यांच्या नावे वीजमीटर घेतले. जितेंद्र भिल 200 रुपये रोजंदारीने कामाला जातात. त्यांच्या झोपडीत एक बल्ब आणि एक टेबल पंखा आहे. जूनमध्ये त्यांना तब्बल 82 हजार 100 रुपये वीज देयक देण्यात आले. त्याबाबत जितेंद्र भिल यांनी वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधला. घरात एक बल्ब आणि  पंख्याशिवाय काहीही नसल्याचे सांगितले. कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून वीज देयक हिसकावून अर्ज करा आणि चालते व्हा, म्हणत हाकलून लावले.

जितेंद्र भिल तसेच माघारी घरी आले. दोन दिवसांपूर्वी त्यांना जुलैचे देयक प्राप्त झाले. त्यावर महिनाभराचे एक हजार 160 व मागील महिन्याची 82 हजार 100 रुपये थकबाकी, असे 83 हजार 260 रुपयांचे देयक देण्यात आले. त्यांनी पुन्हा वीज वितरणचे कार्यालय गाठले. महिनाभरापूर्वी अर्ज केला होता, त्याबाबत विचारणा केली. कर्मचाऱ्यांनी मागील अर्जाची शोधाशोधही केली. मात्र, अर्ज मिळून आला नाही. कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. भिल यांनी पुन्हा तक्रार अर्ज दिला. त्यांना वीज वितरण प्रशासन न्याय देईल की नाही, ते लवकरच कळेल. गोरगरिबांची फसवणूक करून पैसे उकळण्याचा नवा धंदा वीज वितरणच्या काही महाभागांनी सुरू केला आहे का, असाही प्रश्न आता विचारला जात आहे.

एक बल्ब आणि एक पंखा महिनाभर 24 तास वापरला, तरीही 82 हजार देयक येणार नाही. मात्र, तालुक्यात हा चमत्कार घडला आहे. वीज महावितरणच्या गलथान आणि गचाळ कारभाराविरोधात असंख्य तक्रारी आहेत. उन्हाळ्याच्या नावाने अव्वाच्या सव्वा देयके देवून पठाणी पद्धतीने वसुली करण्याचे प्रकारही घडले आहेत. शिवाय, दिवसभरात किमान 10 वेळा वीज खंडित करण्याचे प्रकार होतात. त्याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वाढीव देयकांनी त्रस्त झालेल्या जनतेने आता रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---