जामनेर : शहरातील राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह शिवसृष्टीचे व भुसावळ चौकात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह भीम सृष्टीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयन राजे भोसले, छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी थाटात पार पडले.
खऱ्या अर्थाने जामनेर तालुक्याचे शिल्पकार गिरीश महाजन हे आहेत. त्यांनी गेल्या ३० वर्षात शहराचाच नव्हे तर जामनेर तालुक्याचा केलेला विकास हा वाखण्याजोगा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या कर्तबगारीची जाहीरपणे स्तुती केली.
ते म्हणाले, जे ठरवले ते काम हाती घेतल्यानंतर ते तळीस न्यायचे. यासाठी वाटेल ते परिश्रम घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळेच जामनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास होताना दृष्टीक्षेपास पडताना दिसून येत आहे, असे गौरवोद्गारही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.
गिरीश महाजन हे फक्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जामनेर येथे येतील त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही जामनेरकरांची असेल. त्यांना येथे कोणीही पराजीत करू शकत नाही. त्यांची कामे ही सचोटी असल्याने ना. महाजन यांना संकटमोचक म्हणून संबोधले जाते, असेही ते म्हणाले. सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्याची जबाबदारी जामनेरकरांची असेल, अशी साद त्यांनी घातली. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, भव्य दिव्य असे शिवस्मारक जामनेर नगरीत व्हावे, असे आपले सर्वांचे स्वप्न होते. त्याचबरोबर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही भव्य पुतळा जामनेरमध्ये असावे. त्यानुसार शिवसृष्टी आणि भिमसृष्टीचे अनावरण झाले आहे. अनेक महापुरुषांचे पुतळे तालुकाभरात उभे करायचे आहेत. जामनेरचा चेहरा मोहरा बदलावयाचा आहे. तीस वर्षापासून सहा वेळा आमदार करुन जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, त्याचे ऋण मी कदापिही विसरणार नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाच्या मुलाला तुम्ही निवडून देत आहे. तुमच्यामुळे मी इतका मोठा झालो. कधीही माझ्या डोक्यात आमदार, मंत्री असल्याची हवा जाऊ देणार नाही. नेहमीच तुमच्या सुखदुःखात मी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. खा. उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्र राजे भोसले, मंत्री रक्षा खडसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, नगराध्यक्षा साधना महाजन, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, रवींद्र झाल्टे, प्रा. शरद पाटील, महेंद्र बाविस्कर, तुकाराम निकम, मुख्याधिकारी नितीन बागुल तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.