Shivshahi Bus Accident News: गोंदियात शिवशाही बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, गोंदिया-कोहमारा राज्य महामार्गावरील खजरी गावाजवळ शुक्रवारी १२.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ही बस भंडारा येथून साकोली लाखनी मार्गे गोंदियाकडे जात होती. वळण घेत असताना अचानक समोरून एक दुचाकी आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात आले. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या बस अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहेत. तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी म्हटले.