जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटमध्ये एका व्यावसायिकाने आज स्वातंत्र्य दिनी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुकानातच गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रमेश देवराम पाटील (वय५१ मु. रा. गाढोदा ता. जळगाव ह. मु. शिवशक्ती नगर, निमखेडी जळगाव) असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे. घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
रमेश पाटील हे गेल्या १५ ते २० वर्षांपासून कॉम्प्युटरचा व्यवसाय करतात. त्यांचे ॲरोटेक कॉम्प्युटर नावाचे गोलाणी मार्केटमधील ग्राऊंड प्लोअरला सी -२४६ क्रमांकाचे दुकान आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रमेश पाटील यांनी दुकान उघडून देवांच्या फोटोला अगरबत्ती लावून पूजा केली. यानंतर अर्धवट शटर बंद करून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. यानंतर दुकानात काम करणाऱ्या त्यांच्या साडूच्या मुलाने शटर उघडून पाहताच त्याने आरडा ओरड केल्याने आवाज ऐकून शेजारच्या व्यापाऱ्यांनी धाव घेतली.यावेळी दोरीला लटकलेल्या अवस्थेत रमेश पाटील दिसून आल्यानंतर दोर कापून त्यांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. यावेळी घटनास्थळी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणवर गर्दी केली होती. रमेश पाटील यांनी आत्महत्या का केली याबाबत कोणतेही कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २मुली, १ मुलगा असा परिवार आहे.
दरम्यान घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेऊन घटनास्थळाची माहिती घेतली. याबाबत घटनेची नोंद करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरु होते.