धक्कादायक : विजेच्या खांबांवरुन पडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वायरमन नसतांना विजेच्या खांबावर दुरुस्ती करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा शॉक लागून खाली कोसळल्याने मृत्यू ओढावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, तिलाली तलवाडे ग्रामपंचायतीचे कर्मचारी बापु गोविंद शिंदे (वय ३५ वर्ष रा. शनिमांडळ तिलाली ता.जि. नंदुरबार) यांना ते वायरमन नसतांना त्यांना इलेक्ट्रिक खांबावर चढवून तारा दुरुस्तीचे काम करण्यास सांगण्यात आले. हे काम त्यांना गणेश सुर्यवंशी शनिमांडळ, योगेश प्रकाश सोनवणे (रा. भामरे ता. साक्री जि. धुळे) , आणि वसंत शंभु शिंदे (शनिमांडळ ता.जि. नंदुरबार) या तिघांनी सांगितले.

बापू शिंदे हे वायरमन नसल्याने त्यांना शॉक लागून ते खांबावरून खाली कोसळले. बापु शिंदे यांना शॉक लागुन ते खांबावरुन पडल्यानंतर आरोपींनी त्यांना उपचारासाठी न नेता घटनास्थळानरून सोडुन पळ काढला. शिंदे यांना उपचारासाठी नेले असते तर त्यांचा जिव वाचला असता याची जाणीव असतांना सुध्दा आरोपी पळुन गेले, याप्रकरणी तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक विवेक पाटील अधिक तपास करीत आहेत.