---Advertisement---
गाझापट्टीत इस्रायलने हमासचा सर्वनाश केला, उपासमारीमुळे शेकडो लोकांचा बळी घेतला असून, हा एक प्रकारचा नरसंहार असल्याचे काँग्रेस नेत्या प्रियांका वढेरा यांनी म्हटले. यावर तीव्र आक्षेप घेत हमासवर दया दाखवण्याचा प्रकार लज्जास्पद असल्याची टीका भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी प्रियांका वढेरा यांच्यावर केली.
अझर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, इस्रायलवर हल्ला करून नागरिकांचे अपहरण करणारे आणि त्यांना अमानुष यातना देणारे हमासचे दहशतवादी निष्पाप असूच शकत नाही. इस्रायलवर हल्ला करणाऱ्या २५ हजार हमासच्या सदस्यांना आम्ही यमसदनी पाठविले.
इस्रायलने गाझामध्ये २० लाख टन अन्न पोहोचवले, तर हमास ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यामुळे उपासमारीचे संकट निर्माण झाले. हमासकडून जारी करण्यात येणाऱ्या चित्रफीत आणि निवेदनावर विश्वास ठेवून इसापलविरोधात प्रियांका वढेरा यांनी केलेल्या टिप्पणीचा आम्ही निषेध करतो. हमासवर दया दाखविणे लज्जास्पद आहे.
प्रियांका यांचे आरोप काय ?
प्रियांका यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, इसायल गाझात नरसंहार करीत आहे. त्यांनी १८,४३० मुलांसह ६० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला. उपासमारीने मृत्यूचा धोका वाढला आहे. यावर भारत सरकारचे मौन नरसंहाराला पाठिंबा देण्यासारखे आहे. ‘अल जझीरा’च्या पाच पत्रकारांची क्रूर हत्या हा पॅलेस्टाईनच्या भूमीवर केलेला आणखी घृणास्पद गुन्हा आहे. विशेष असे की, इस्रायली सैन्याने हल्ल्यात ठार झालेले पत्रकार अनस अल-शरीफ यांना हमासचा दहशतवादी घोषित केले होते.