अडावद, ता. चोपडा : येथून जवळ असलेल्या पिंप्री, ता. चोपडा येथे १६ डिसेंबरपासून सात दिवसीय संगीतमय प्रभू श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे आयोजन पिंप्री तापीकाठ आश्रम आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. ओंकारेश्वर येथील प. पू. साध्वी प्रिती देवी यांच्या मधुर वाणीतील प्रभू रामचंद्रांची जीवन गाथा कथा रूपात सांगण्यात येईल. तरी पंचक्रोशीतील भविकभक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन पिंप्री तापीकाठ आश्रमचे रविकिरणदास महाराज तथा ग्रामस्थांनी केले आहे.
ही कथा १६ डिसेंबर ते २२ डिसेंबर पर्यंत रोज दुपारी २ ते ५ या वेळात पिंप्री येथील श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात उभारलेल्या भव्य मंडपात संपन्न होईल. यावेळी विविध संतांची उपस्थिती लाभेल, ज्यात गुणा जिल्ह्यातील हरदासजी महाराज, ओंकारेश्वर येथील आचार्य तुलसीदासजी महाराज, गोपालदासजी महाराज, राजेंद्रगिरी महाराज, शंभूदास महाराज, आणि बच्चनदास महाराज यांचा समावेश आहे.
१६ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान श्रीराम ग्रंथ व भव्य कलश शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ३ वाजेदरम्यान पूर्णाहुती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
याशिवाय, या कथेचे लाईव्ह प्रसारण ‘एकता न्युज’ या युट्युब चॅनेलवर करण्यात येणार आहे. पिंप्री परिसरातील गावातील तरुणांनी आणि नागरिकांनी या भव्य दिव्य कार्यक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन नियोजन समितीने केले आहे.