मुंबई : येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या मंदिरात भाविकांसाठी नवीन ड्रेस कोड लागू केला गेला आहे. याबाबतचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा ड्रेस कोड केव्हापासून लागू करण्यात आला आहे येथे तुम्हाला कोणत्या कपड्यांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही ते आपण आता जाणून घेऊया.
मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंतीचा उत्सव १ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. गणेश जयंती साजरी करण्यासंदर्भात मंदिर प्रशासनाची महत्वपूर्ण अशी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या ड्रेस कोडबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. भाविकांच्या ड्रेस कोड काय असावा ? भाविकांनी मंदिरात येताना कोणत्या प्रकारचे वस्त्र परिधान करावे व कोणते नाही याबाबत चर्चा झाली. यानंतर बैठकीत भाविकांचा दर्शनासाठी येतांना कोणता ड्रेस कोड असावा हे ठरविण्यात आले.
या निर्णयानुसार मंदिरात लहान कपडे घालून येण्यास बंदी घालण्यात आली. कोणीही हाफ पँट घालून मंदिरात येणार नाही. हाफ पँट घालून येणाऱ्या महिला व पुरुषांना मंदिरात येता येणार नाही. जर तुम्ही लहान कपडे घालून मंदिरात आलात तर तुम्हाला मंदिरात प्रवेश नाकारण्यात येईल. आपण ज्या पद्धतीने घरी सण-उत्सव साजरा करताना ज्या श्रद्धेने कपडे परिधान करतो त्याच श्रद्धेने भाविकांनी मंदिरात यावे, असे मंदिर प्रशासनाचे मतं आहे. मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे की, आजकाल पुरुष आणि महिला लहान कपडे घालून मंदिरात येतात, जे मंदिर आणि भाविकांना शोभत नाही. या करिता भाविकांनी लहान कपडे घालून मंदिरात येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.