मुक्ताईनगर : पाण्याचा अंदाज न आल्याने भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी चार वाजता सालबर्डी शिवारातील तलावात घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वेदांत कृष्णा ढाके (16) व चिराग कृष्णा ढाके (11) अशी मयतांची नावे आहेत.
तलावाबाहेर आढळली सायकल
सातबर्डी गावातील कृष्णा ढाके यांची वेदांत व चिराग ही दोन्ही मुले रविवारी दुपारी केस कापून आल्यानंतर सालबर्डी शिवारातील तलावावर पोहण्यासाठी गेली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चिराग पाण्यात बुडू लागल्यानंतर त्यास वाचवण्यासाठी वेदांत हादेखील गेला मात्र दोघांचाही पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.
या घटनेने सालबर्डी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
सालबर्डी शिवारात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे तलाव निर्माण झाला आहे. याच तलावाने दोन अल्पवयीन मुलांचा बळी घेतला आहे. मयत भावंडांचे वडील रिक्षा चालवून तर आई शेतमजुरी करून उदरनिर्वाह करते.