दुर्दैवी! दुभाजकाला आदळून कार पेटली; गर्भवतीचा होरपळून करुण अंत…

---Advertisement---

 


जळगाव : जिल्हयातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. भरधाव कार दुभाजकाला आदळल्यानंतर आगीचा भडका उडाला. यात अवघ्या २१ वर्षाच्या सहा महिन्यांच्या गर्भवतीचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. तर पती गंभीर भाजला गेला आहे.

वाकोदनजीक सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ही दुर्दैवी घटना घडली. जान्हवी संग्राम मोरे (२१) असे मृत महिलेचे, तर संग्राम जालमसिंग मोरे (२३, रा. कुलमखेड, जि. बुलढाणा) असे जखमी पतीचे नाव आहे.

सहा महिन्यांची गर्भवती असलेली जान्हवी पतीसोबत माहेरी बोहार्डी (ता. भुसावळ) येथे आली होती. तिथून ती पती संग्रामसह सीएनजी इंधनावर चालणाऱ्या कारने (क्र.एमएच २० जीव्ही २१२४) छत्रपती संभाजीनगरकडे जात होती.

कारमध्ये पती-पत्नी दोघेच होते. वाकोदनजीक त्यांची कार दुभाजकावर धडकली आणि कारला आग लागली. अपघात झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर पहूर पोलिस स्टेशनचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी आले होते. कार दुभाजकावर आदळताच, मोठा आवाज झाला.

आवाज ऐकून पोलिस घटनास्थळी धावले. पोलिसांनी गाडीच्या काचा दगडाने फोडून संग्राम मोरे यांना बाहेर काढले. त्यावेळी कारमध्ये पत्नी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांचा प्रयत्न अन् कारने घेतला पेट

पोलिस आत अडकलेल्या जान्हवीला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना कारने प्रचंड पेट घेतला आणि बंद कारमध्येच होरपळून जान्हवीचा करुण अंत झाला. संग्राम हा या घटनेत गंभीररीत्या भाजला आहे, शिवाय त्याच्या दोन्ही पायांना जबर मार लागला आहे. जखमी संग्राम यास पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---