नाशिक – नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेल्या नाईक संदीप सिंह याला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी (ISI) हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपीने लष्कराशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानपर्यंत पोहोचवली, असा धक्कादायक खुलासा झाला आहे.
गुप्त माहितीचा व्यापार – १५ लाखांची देवाणघेवाण
संदीप सिंह याने लष्करी छावण्यांची माहिती, तैनातीच्या तपशीलासह शस्त्रास्त्रांचे फोटो पाकिस्तानला पाठवले होते. या बदल्यात त्याला वेगवेगळ्या खात्यांद्वारे तब्बल १५ लाख रुपये मिळाले, अशी माहिती अशी माहिती समोर आली आहे.
काल (शनिवारी, ता- 8) दुपारी पत्रकार परिषद घेऊन एसएसपी चरणजित सिंह सोहल आणि एसपी हरिंदर सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आरोपी संदीप सिंहने सैन्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती विकली आहे. या कामासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून जवळपास पंधरा लाख रूपये मिळाले आहेत.
हेही वाचा : Naxalite Encounter: छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोठी कारवाई – ३१ नक्षलवादी ठार, २ जवान शहीद
अशी झालीअटक ?
नाशिक कॅन्टोन्मेंटमधील संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवली जात होती. तपासानंतर संदीप सिंह याला पटियाला, पंजाब येथून अटक करण्यात आली, जिथे तो रजेवर गेला होता. त्याच्या ताब्यातून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
यापूर्वीही हेरगिरीचा प्रकार उघड
ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नाशिक कॅन्टोन्मेंटमधील कॉन्स्टेबल अमृतपाल सिंह यालाही हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याने ISI च्या संपर्कातील एका व्यक्तीकडून २ लाख रुपये घेतले होते.
लष्कराच्या सुरक्षेसाठी मोठा धक्का
गेल्या दोन वर्षांत संदीप सिंह याने नाशिक, जम्मू आणि पंजाबमधील लष्करी छावण्यांचे गुप्त फोटो व माहिती पाकिस्तानला पुरवली. हा प्रकार उघड झाल्यानंतर लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनी सैन्यातील इतर संशयितांवरही कठोर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
हा प्रकार भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धोका मानला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.