हत्या… आत्महत्या करणे किती सोपे झाले आहे…

---Advertisement---

 

चंद्रशेखर जोशी
जळगाव दिनांक : “आई मी जरा बाहेर जाऊन येतो गं…” आई उत्तरते… “हो बाळा… पण लवकर ये हं…!” आईच्या आवाजातील ती काळजी…तो आपलेपणाचा ओलावा… जणू तिचे ते सर्वस्वच आणि काही वेळाने निरोप येतो त्याची हत्या झाली किंवा त्याने आत्म्ाहत्या केली. किती हे भयंकर… या घटनेमुळे त्या घरातील एक व्यक्ती जात नाही तर ते घर उद्ध्वस्त होते. एक जीवन संपत नाही तर ती घटना कळल्याने कित्येकांच्या श्वासाचा ताल हरपतो… हळहळ व्यक्त होते. ज्यानं कालपर्यंत सगळ्यांसाठी धावपळ केली, त्या व्यक्तीचं आज अचानक जाणं, निर्जीव रूप पाहताना अनेकांना आतून मोडून पडल्यागत स्थिती होते. आई-बापाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, आक्रोश पहावला जात नाही. डोळ्यातून वाहणारे अश्रू हे फक्त पाणी नसतं तर तिने त्या मुलाबाबत पाहीलेले स्वप्न, अपेक्षा घळघळ वाहत असतात. आणि वडिलांचा नि:शब्दपणा हा तुटलेल्या कण्यासारखा असतो. या घटनांमागील कारणेही किती किरकोळ असतात… बघा ना… माझ्याकडे खुन्नस देऊन पाहतो म्हणून एकाला तिघा चौघांनी घेरून त्याचा जीव घेतला… हॉटेलमध्ये पैशाचा वाद विकोपाला जाऊन एखाद्याची हत्या होते.

मागे भुसावळमध्ये एका हॉटेलमध्ये अशीच घटना घडली होती. एकाने दुसऱ्याचा संतापात गळा चिरला… त्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजचा तर व्हिडीओ व्हायरल झाला होता. किती थरारक हा प्रकार… खून करणे… एखाद्याचा जीव घेणे एवढे सोपे झाले आहे… क्षणिक राग… संताप… एक नाही तर दोन ते तीन जणांचे किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचे जीवन उद्ध्वस्त करत असतो. क्षणाचा राग भयंकर ठरतो… त्यात आता तर पिस्तुलसारखे हत्यार किती पटकन मिळते. चाकू, धारदार सुरे तर रस्त्यावर मिळतात. बऱ्याच वेळेस पती-पत्नीतील वाद विकोपाला जातो. ती सारखी मोबाईलशी खेळते… तिचे जुन्या मित्र-मैत्रिणींशी संभाषण सहन न होऊन एक तर तिची हत्या होते वा ती रागाच्या भरात आत्महत्या करते. माहेरचा लडीवाळपणा… सुख… सासरी मिळेलच असे नाही. आमच्या संस्कृतीत स्त्री घरात सतत काम करत रहाणार असेच दृश्य पहावे लागते… सासरी गेल्यावर त्या सुखाची सवय असलेली सून लगेचच सर्वकाही आत्मसात करेलच असे नाही. तिला काही काळ द्यावा लागत असतो. मात्र वाट पहाणार कोण? मग काही जण तिची हत्या करून स्वत: तर काही मुलांसह आत्महत्या करतात.

काही प्रकार तर खूपच धक्कादायक असतात. दहावी, बारावी, अभियांत्रिकी परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा अपयश आले म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात… आमच्या जिल्ह्यातही असे प्रकार अनेक वेळा घडले आहेत आणि घडतात. मोबाईल पाहू दिला नाही म्हणूनही काही निरागस जीव आत्महत्या करतात. आत्महत्या, खून करणे याची बरीच कारणे अगदी क्षुल्लकच पण त्याचा एखाद्या व्यक्तीवर त्याच्या कुटुंबियांवर दूरगामी परिणाम करणारा ठरत असतो. पूर्वी मोठे दुष्काळ पडत असत. आकाशात ढगांची गर्दी दिसत असे आणि काही वेळात सारे काही स्वच्छ…पाऊस आज पडेल… उद्या पडेल या चिंतेत तो शेतकरी डोळ्यात प्राण आणून बघत असायचा पण पाऊस होत नसे… दुष्काळाचे सावट तो सहन करून जायचा… खरीप नाही रब्बीत काही हाती येईल या आशेवर ते जगायचा… उधार-उसनवार करून कुटुंबाचे पोट भरायचा पण हारत नव्हता.

आज नैसर्गिक आपत्ती आल्याने नुकसान झाले म्हणून अनेक शेतकरी आत्महत्या करतात. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे. आम्ही व आमचे कुटुंब…पण त्यातही संवाद नावाची गोष्ट हरपलेलीच. त्या व्यक्तीच्या जाण्यातून रिकाम्या जागेच काही उत्तर नसत. फक्त त्या कुटुंबाच्या मुखातून फुटलेला हंबरडा… तो हृदयात खोल जात असतो. ते कुटुंब पुन्हा जगायला लागते…पण आधीसारखं नाही. व्यक्ती गेली की तिच जगण थांबत… पण त्याच्या पश्चात असलेल्यांचं जगणं तुटलेलंच सुरू रहातं… घरातील प्रत्येक व्यक्ती जगते पण त्यात फारसा जिवंतपणा नसतो. गेलेल्या व्यक्तीचे कपडे… वेगवेगळ्या पोझमधील फोटो… काही क्षण चेहऱ्यावर हास्य फुलवते.. पण दुसऱ्याच क्षणी अरे… हा आज नाही या कल्पनेनं उदासपणा घेरून मन सुन्न होते. दिवा विझला की अंधार होतो… पण जीवन विझले की अपेक्षेने जगणाऱ्या माता-पित्यांचे जीवन विझते…त्यांच्या स्वप्नांचा अपेक्षांचा चुराडा होत असतो. आपला मुलगा…मुलगी कोठे जाते…त्यांची संगत… त्यांचे वागणं याचे निरीक्षण माता-पित्यांनी करणे गरजेचे आहे. त्याची प्रत्येक गोष्ट कौतुकानेच न पहाता त्यातील त्रुटींची जाणीव त्याला करून देणे गरजेचे असते. तू असं वागलास तर काय होईल. याचं धारिष्ट्य पालकांनी दाखवले पाहिजे. अपयश हे यशाची पायरी हे समजावून सांगितले पाहिजे…तो संवाद होत राहिला तर निश्चितपणे बऱ्याच गोष्टी टळतील व हत्या… आत्महत्या काही प्रमाणात का होईना टळतील..!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---