Maharashtra Temperature : राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तापमान झपाट्याने वाढत आहे. पुण्यात ३५.८ अंश सेल्सियसपर्यंत तापमान पोहोचले असून, इतर अनेक ठिकाणीही पारा चढलेला आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र तापला
गेल्या २४ तासांत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात ४ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे. ठाण्यात ३६.६ अंश, सांगलीत ३७.१ अंश, तर अकोला, सोलापूर, जेऊर आणि परभणी येथे तापमान ३७ अंशांच्या पुढे गेलं आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा
राज्यात तीव्र उन्हाचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होणार आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान १ ते २ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नागरिकांनी घ्यावी काळजी
राज्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. घराबाहेर पडताना टोपी, गॉगल, आणि पाणी बरोबर ठेवावं. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं. तसेच भरपूर पाणी प्यावं आणि ऊन टाळण्यासाठी सावलीत राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील तापमान आणखी वाढणार असून उन्हाळा कडक जाण्याची शक्यता आहे. उष्णतेपासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.