---Advertisement---
जळगाव : पोलीस दलातील कर्मचारी महिलेच्या १५ वर्षीय मुलीवर तिच्या सावत्र बापाने धमकावित अत्याचार केल्याची निंदणीय व घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. या खळबळजनक घटनेची व्याप्ती जळगाव ते उत्तराखंड राज्यापर्यंत असून याप्रकरणी निवृत्त जवानावर जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. देवेंद्रसिंग कुवरसिंग जिना (वय अंदाजे ४५, रा. गोधरा हिरपूर, जि. नैनीताल उत्तराखंड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
हा प्रकार कळाल्यानंतर पीडितेची आई तसेच सामाजिक महिला कार्यकर्त्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या, मात्र पोलिसांकडून टोलवाटोलवी केल्याची गंभीर बाब समोर आली. सामाजिक कार्यकर्ता महिलांनी वरीष्ठापर्यंत हे प्रकरण उचलुन धरले. याप्रकाराची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात येऊन पीडितेची कैफियत ऐकुन घेतली. याप्रकरणी अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद करुन शून्य नंबरने दाखल करुन घेतली.
दरम्यान, नैनीताल येथे ही पीडित मुलगी आंघोळ करत असताना या सावत्र बापाने तिचा गुपचुप व्हिडिओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या पीडित मुलीवर त्याने अत्याचार केला. हा प्रकार फेब्रुवारी २०२५ मध्ये घडला होता. बदनामी आणि भीतीमुळे पीडितेने या प्रकाराची वाच्यता केली नाही.
देवेंद्रसिंग जिना हा ऑगस्ट २०२५ मध्ये जळगाव येथे पोलीस वसाहतीमध्ये आला होता. पीडित मुलीची आई कामानिमित्त घराबाहेर गेली होती. तेव्हा आंघोळीचा व्हिडीओ दाखवून व्हायरल करण्याची धमकी देत पीडित मुलीवर त्याने अत्याचार केला. हा प्रकार कोणाजवळ सांगितल्यास खैर नाही, असा तिला दम भरला. याप्रकाराने पीडित मुलगी धास्तावली होती.
शनिवारी (१५ नोव्हेबर) देवेंद्रसिंग जिना आणि त्याची पोलीस महिला पत्नी यांच्यात वाद झाला होता. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवून घेण्यात आली होती. तक्रार दिल्याचा राग आल्याने देवेंद्रसिंग याने व्हिडिओ व्हायरल करण्याची महिलेस धमकी दिली. तेव्हा पीडित मुलीच्या आईला तिच्या या पतीच्या घृणास्पद प्रकाराची माहिती झाली. या भयंकर घटनेने ती संतप्त झाली.
पतीला कायद्याच्या कचाट्यात शिक्षा करण्याच्या मानसिकतेतून पीडित मुलीच्या आईने सोमवारी (१७ नोव्हेंबर) जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठत कैफियत मांडली. मात्र तिची तक्रार बेदखल करण्यात आली. अधिकारी कर्मचाऱ्यांनी कानावर हात ठेवले.
पोलीस महिलेने सामाजिक कार्यकर्त्याची भेट घेत प्रकार त्यांच्या कानावर टाकला. या कार्यकर्त्या महिलांनी घटनेचे गांभीर्य वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर टाकले. सोमवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे हे जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्वरीत कारवाई करुन आरोपीला ताब्यात घेऊन शिक्षेसाठी पुढाकार घेतला जावा, अशी भावना व्यक्त झाली.









