पाळधी : एकीकडे नवीन वर्षाचा जल्लोष होत असताना दुसरीकडे पाळधीत झालेल्या वादाने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ कारणावरुन पाळधी (ता. धरणगाव) येथे मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास वाद झाला. त्यातून कारचालकाला मारहाण करुन कारची तोडफोड करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या रात्री जळगावातील पाळधी गावातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कुटुंबीयाला घेऊन एक गाडी चालली होती. यावेळी या गाडीच्या वाहनचालकाने हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. यानंतर दोन गट आमने सामने आली आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती धरणगावचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी दिली. रात्री १२ वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पाळधीत भेट देवून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जाळपोळ करणारे तरुण पसार झाल्याने पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला असून जाळपोळीला कारणीभूत असलेल्या तरुणांची धरपकड सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. घटनास्थळावरून आरोपी पळून गेल्याने परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
पाळधी गावात संचारबंदी
पाळधी मध्ये पूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या वाहनातून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून या ठिकाणच्या ग्रामस्थांना संचार बंदीबाबत सूचना देण्यात आली होती. पाळधी गावांमध्ये पहाटे सहा वाजेपर्यंत कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाळधी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी सात ते आठ संशयितांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक अधिकाऱ्यांचा ताफा या ठिकाणी रात्रभरापासून ठाण मांडून होता. सद्यस्थितीत पाळधी गावामध्ये पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.