Taloda News : ‘विक्रम-वेताळ’ कथा; शहरात मुख्याधिकाऱ्यांच्या कारवाईविरोधात जोरदार चर्चा

तळोदा (मनोज माळी) : तळोदा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी एका बॅनरवर केलेल्या कारवाईमुळे शहरात वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. विशेषतः या कारवाईला पौराणिक विक्रम-वेताळ कथा जोडली जात असून, शहरात हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

शहारत दि. २८ जानेवारी रोजी ‘जय श्रीराम सोशल ग्रुप’ने स्मारक चौकात एक फलक लावला होता. या फलकाद्वारे शहरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. मात्र, पालिकेच्या कारवाईमुळे हा फलक हटवण्यात आला. विशेष म्हणजे, यापूर्वी इतर कोणत्याही फलकांवर कारवाई झाली नव्हती, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली. प्रशासनाच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून संबंधित ग्रुपने आणखी एक फलक उभारला आणि पुन्हा एकदा नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, शहरातील काही नागरिकांनी या प्रकरणाची तुलना विक्रम-वेताळ कथेशी केली आहे. योगायोगाने मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांचे नाव देखील ‘विक्रम’ असल्याने या घटनेला अधिक गंमतशीर वळण मिळाले. ४ फेब्रुवारी रोजी स्मारक चौकात नव्याने उभारलेल्या फलकावर तर थेट विक्रम-वेताळ कथेवर आधारित चित्रच झळकले!

या सर्व प्रकरणामुळे तळोद्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, प्रशासनाच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जय श्रीराम सोशल ग्रुपने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. आता पालिका या प्रकरणात पुढे काय भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.