शहादा : तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. उषा लेहऱ्या वसावे (वय १३, रा. अट्टी, ता. धडगाव) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. हि संस्था तालुक्यातील सुलतानपूर येथे तात्पुरती स्थलांतरित झालेली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
मुलींच्या वसतिगृहात शनिवारी सकाळी उषा हिने एका खोलीतील हुकला आपली ओढणी अडकवत गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी तिच्या मैत्रिणींनी खोलीच्या दरवाजा उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर तिला तात्काळ नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले परंतु तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत परिसरातच एकाच आक्रोश व्यक्त केला.
हेही वाचा : धक्कादायक ! औषध सांगून विद्यार्थिनींना द्यायचा दारू अन्…, शिक्षकाचा संतापजनक प्रकार
नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन झाल्यावर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणाची जोपर्यंत चौकशी करून दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. आमदार राजेश पाडवी यांनी तत्काळ त्रिसदस्यीय समिती तयार करून दोषींवर प्रकल्प अधिकारी व पोलिसांच्या मध्यस्थीने संबंधित मुख्याध्यापक, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यावर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाइकांनी रात्री उशिरा विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेत अंत्यविधीसाठी आपल्या मूळ गावी घेऊन गेले.
घटना दुर्दैवी असून घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सखोल चौकशी करून हे दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. असा विश्वास आमदार राजेश पाडवी यांनी दिला आहे.
प्राथमिक चौकशीत विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. अधिक चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. मुलीवर काही दबाव होता का, याचा तपास करून अहवाल देऊन संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करू. अशी प्रतिक्रिया नंदुबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, यांनी दिली आहे.